﻿मार्क.
14.
वल्हांडण आणि बेखमीर भाकरीचा सण यांना दोनच दिवसांचा अवधी होता आणि प्रमुख याजकवर्ग आणि नियमशास्त्र शिक्षक, येशूंना गुप्तपणे धरून जिवे मारावे म्हणून संधी शोधत होते. 
ते म्हणाले, “आपण हे सणाच्या समयी करू नये, कारण तसे केले तर लोक कदाचित दंगल करतील.” 
येशू बेथानी येथे असताना, “कुष्ठरोगी शिमोन,” याच्या घरी भोजनास बसले होते, त्यावेळी एक स्त्री, शुद्ध जटामांसीपासून बनविलेले अतिशय मोलवान सुगंधी तेल असलेली एक अलाबास्त्र कुपी घेऊन आत आली आणि तिने ती कुपी फोडून येशूंच्या मस्तकावर ओतली. 
तिथे हजर असलेल्यांपैकी काहीजण एकमेकांना संतापाने म्हणत होते, “तेलाची ही नासाडी कशाला? 
एका वर्षाच्या मजुरीपेक्षाही अधिक किमतीस विकून ते पैसे गोरगरिबांना देता आले असते.” आणि त्यांनी कठोरपणे तिचा निषेध केला. 
“तिच्या वाटेस जाऊ नका,” येशू त्यांना म्हणाले, “तुम्ही तिला त्रास का देता? तिने माझ्यासाठी एक सुंदर कृत्य केले आहे. 
गरीब लोक तर नेहमीच तुमच्याबरोबर असतील. तुम्हाला पाहिजे तेव्हा त्यांना मदत करता येईल. पण मी तुमच्याबरोबर नेहमीच असणार नाही. 
तिला जे करता आले, ते तिने केले. माझ्या अंत्यसंस्कारासाठी तिने माझ्या शरीरावर आधी सुगंधी तेल ओतले आहे. 
मी तुम्हाला निश्चित सांगतो की, जगात जिथे कुठे शुभवार्ता गाजविण्यात येईल, तिथे हिने केलेले हे सत्कार्य हिच्या आठवणीसाठी सांगितले जाईल.” 
नंतर बारा शिष्यांपैकी एक, यहूदाह इस्कर्योत येशूंना विश्वासघाताने धरून देण्यास महायाजकांकडे गेला. 
तेव्हा त्यांना आनंद झाला आणि त्याला मोबदला देण्याचे त्यांनी वचन दिले. मग तो येशूंना त्यांच्या हातात धरून देण्याची योग्य संधी शोधू लागला. 
बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी, म्हणजे रीतीप्रमाणे ज्या दिवशी वल्हांडणाच्या कोकर्‍याचा यज्ञ करत असत, येशूंच्या शिष्यांनी त्यांना विचारले, “वल्हांडणाच्या भोजनाची तयारी आम्ही कुठे करावी अशी आपली इच्छा आहे?” 
तेव्हा येशूंनी त्यांच्या शिष्यांपैकी दोघांना पाठविले आणि सांगितले, “तुम्ही शहरात जा आणि एक मनुष्य पाण्याने भरलेली मोठी घागर घेऊन जात असलेला तुम्हाला भेटेल, त्याच्यामागे जा. 
तो ज्या घरात जाईल त्या घराच्या मालकाला सांगा, ‘गुरुजी विचारत आहेत की, ज्या खोलीत मला माझ्या शिष्यांबरोबर वल्हांडणाचे भोजन करता येईल, ती पाहुण्यांची खोली कुठे आहे?’ 
तो तुम्हाला माडीवरील मोठी तयार व सुसज्ज असलेली एक खोली दाखवेल. तिथे आपल्यासाठी तयारी करा.” 
ते शिष्य नगरात गेले आणि येशूंनी सांगितल्याप्रमाणे त्यांना आढळून आले. तेव्हा त्यांनी वल्हांडणाच्या भोजनाची तयारी केली. 
संध्याकाळ झाल्यावर येशू आपल्या बारा शिष्यांबरोबर तिथे आले, 
ते सर्व मेजाभोवती बसून भोजन करीत असताना येशू म्हणाले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो की, तुमच्यापैकी एकजण माझा विश्वासघात करेल—तो माझ्याबरोबर पंक्तीला बसून जेवत आहे.” 
ते दुःखाने भरून गेले आणि एकामागून एक त्यांना विचारू लागले, “खरोखर तो मी तर नाही ना?” 
“तो तुम्हा बाराजणांपैकी एक आहे.” त्यांनी उत्तर दिले, “जो माझ्याबरोबर ताटात भाकर बुडवीत आहे. 
कारण त्यांच्याबद्दल लिहिले होते त्याप्रमाणे मानवपुत्र जातो खरा. परंतु जो मानवपुत्राला विश्वासघाताने धरून देतो, त्याचा धिक्कार असो. तो जन्मलाच नसता, तर ते त्याला अधिक हिताचे झाले असते.” 
भोजन करीत असताना, येशूंनी भाकर घेतली, तिच्यावर आशीर्वाद मागितल्यावर, ती मोडली आणि आपल्या शिष्यांना देत ते म्हणाले, “ही घ्या, हे माझे शरीर आहे.” 
त्यांनी द्राक्षारसाचा प्याला हाती घेतला व त्याबद्दल आभार मानले आणि मग तो प्याला त्यांना दिला आणि मग ते सर्व त्यातून प्याले. 
मग येशू त्यांना म्हणाले, “हे माझ्या कराराचे रक्त आहे व ते पुष्कळांसाठी ओतले जात आहे 
मी तुम्हाला निश्चित सांगतो की, परमेश्वराच्या राज्यात मी नवा द्राक्षारस पिईन, त्या दिवसापर्यंत द्राक्षवेलीचा उपज मी पिणार नाही.” 
मग त्या सर्वांनी मिळून एक गीत गाईले आणि ते जैतुनाच्या डोंगराकडे गेले. 
“तुम्ही सर्वजण मला सोडून जाल,” येशू शिष्यांना सांगू लागले, “कारण असे लिहिले आहे: “मी मेंढपाळावर प्रहार करेन आणि मेंढरांची पांगापांग होईल. 
परंतु मी पुन्हा जिवंत झाल्यावर, तुमच्या आधी गालीलात जाईन आणि तिथे तुम्हाला भेटेन.” 
पेत्र जाहीरपणे म्हणाला, “जरी सर्वांनी सोडले, तरी मी तुम्हाला सोडून जाणार नाही.” 
“पेत्रा,” येशू म्हणाले, “मी तुला निश्चित सांगतो की, आज; होय, आजच रात्री दोन वेळा कोंबडा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील.” 
परंतु पेत्र ठामपणे म्हणाला, “मला तुमच्याबरोबर मरावे लागले, तरी मी तुम्हाला नाकारणार नाही.” आणि बाकीचे सर्व असेच म्हणाले. 
आता ते गेथशेमाने नावाच्या ठिकाणी आले. येशू आपल्या शिष्यांना म्हणाले, “मी प्रार्थना करेपर्यंत येथे थांबा.” 
त्यांनी पेत्र, याकोब आणि योहान यांना बरोबर घेतले आणि ते अत्यंत अस्वस्थ आणि व्याकूळ होऊ लागले. 
ते त्यांना म्हणाले, “मरणप्राय दुःखाने माझा आत्मा अतिशय व्याकूळ झाला आहे. तुम्ही येथेच थांबा आणि जागे राहा.” 
थोडे पुढे जाऊन ते भूमीवर पालथे पडले आणि त्यांनी प्रार्थना केली की शक्य असल्यास ही घटका त्यांच्यापासून टळून जावी. 
“अब्बा! पित्या!” ते म्हणाले, “आपल्याला शक्य असल्यास, हा प्याला दूर करा. तरीपण माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे, तर आपल्या इच्छेप्रमाणे होवो.” 
नंतर ते शिष्यांकडे परत आले, तेव्हा ते झोपी गेले आहेत, असे त्यांना आढळले. “शिमोना,” ते पेत्राला म्हणाले, “तू झोपी गेला आहेस काय? एक तासभरही तू जागे राहू शकला नाही का? 
तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून सावध राहा आणि प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे, परंतु देह अशक्त आहे.” 
येशू पुन्हा गेले आणि त्यांनी तीच प्रार्थना केली. 
नंतर ते परत त्यांच्याकडे आले, त्यावेळीही ते झोपी गेलेले आढळले, कारण त्यांचे डोळे जड झाले होते आणि त्यांना काय उत्तर द्यावे हे समजले नाही. 
मग ते तिसर्‍या वेळेस परत आले आणि त्यांना म्हणाले, “तुम्ही अजूनही झोप व विसावा घेत आहात काय? पुरे झाले! पाहा वेळ आली आहे आणि मानवपुत्र पापी लोकांच्या हाती धरून दिला जात आहे. 
उठा, आपण जाऊ! माझा विश्वासघात करणारा आला आहे.” 
ते बोलत आहेत तेव्हाच, त्यांच्या बारा शिष्यांपैकी एक यहूदा, महायाजकांनी आणि वडीलजनांनी पाठविलेल्या तरवारी आणि सोटे धारण करणार्‍या जमावाला बरोबर घेऊन पुढे आला. 
आता त्या विश्वासघातक्याने जमावाला खूण देऊन ठेवली होती, “ज्या मनुष्याचे मी चुंबन घेईन त्याला अटक करा आणि शिपायांच्या बंदोबस्तात घेऊन जा.” 
तत्क्षणी यहूदाह येशूंच्या जवळ गेला, “गुरुजी!” त्याने उद्गार काढले आणि त्यांचे चुंबन घेतले. 
त्या पुरुषांनी येशूंना धरले आणि अटक केले. 
पण तेवढ्यात जे उभे होते त्यांच्यातील एकाने तरवार उपसून महायाजकाच्या दासावर वार करून त्याचा कान कापून टाकला. 
येशूंनी विचारले, “मी बंडखोरांचा नेता आहे काय, की तुम्ही तरवारी आणि लाठ्या घेऊन मला धरावयास आला आहात? 
मी दररोज तुमच्याबरोबर होतो, मंदिराच्या परिसरात शिकवीत असे, पण तुम्ही मला धरले नाही. परंतु धर्मशास्त्र पूर्ण झाले पाहिजे.” 
मग सर्वजण त्यांना सोडून पळून गेले. 
मात्र, तागाच्या वस्त्राशिवाय अंगावर काहीही न पांघरलेला एक तरुण येशूंच्या मागे चालला होता. जमावाने त्यालाही धरण्याचा प्रयत्न केला, 
परंतु आपले वस्त्र सोडून तो तसाच उघडा पळून गेला. 
येशूंना महायाजक कयफाकडे नेण्यात आले. लवकरच दुसरे सर्व मुख्य याजक व वडीलजन आणि नियमशास्त्र शिक्षक गोळा झाले. 
पेत्र काही अंतरावरून, त्यांच्यामागे चालत, महायाजकाच्या अंगणात आला आणि तिथे तो पहारेकर्‍यांसोबत जाऊन बसला आणि शेकोटीजवळ ऊब घेत बसला. 
मुख्य याजक आणि सर्व यहूदी न्यायसभा येशूंना जिवे मारण्यासाठी पुरावे शोधण्याचा प्रयत्न करीत होते, परंतु ते त्यांना सापडले नाही. 
नंतर अनेकांनी त्यांच्याविरुद्ध खोटी साक्ष दिली, परंतु त्यांच्या बोलण्यात ताळमेळ बसत नव्हता. 
नंतर काहींनी उठून त्यांच्याविरुद्ध ही खोटी साक्ष दिली: 
“आम्ही त्याला बोलताना ऐकले, ‘मनुष्यांनी बांधलेले हे परमेश्वराचे मंदिर मी उद्ध्वस्त करेन आणि तीन दिवसात हातांनी न बांधलेले असे दुसरे मंदिर पुन्हा उभे करेन.’ ” 
तरीपण त्यांच्या साक्षीमध्येही काही ताळमेळ नव्हता. 
हे ऐकून महायाजक त्यांच्यापुढे उभा राहिला आणि त्याने येशूंना विचारले, “या आरोपांना तू उत्तर देणार नाही काय?” हे लोक जी साक्ष तुझ्याविरुद्ध सांगत आहेत ती काय आहे? 
पण ख्रिस्त शांत राहिले आणि त्यांनी काही उत्तर दिले नाही. नंतर महायाजकाने त्यांना पुन्हा विचारले, “धन्यवादित परमेश्वराचा पुत्र ख्रिस्त तो तू आहेस का?” 
“मी आहे,” येशूंनी उत्तर दिले, “आणि तुम्ही मानवपुत्राला सर्वसमर्थाच्या उजवीकडे बसलेले आणि आकाशातून मेघारूढ होऊन परत येत असलेले पाहाल.” 
महायाजकाने आपली वस्त्रे फाडली आणि तो म्हणाला, “आता आणखी साक्षीदारांची आपल्याला काय गरज आहे? 
तुम्ही ईश्वरनिंदा ऐकली आहे, आता तुम्हाला काय वाटते?” तो मृत्युदंडास पात्र आहे असा सर्वांनी त्यांच्यावर आरोप केला. 
त्यांच्यापैकी काहीजण येशूंवर थुंकू लागले. त्यांनी त्यांचे डोळे बांधले, त्यांना बुक्क्या मारल्या आणि म्हटले, “भविष्यवाणी करा!” मग पहारेकर्‍यांनी त्यांना चपराका मारून आपल्या ताब्यात घेतले. 
हे सर्व होत असताना, पेत्र खाली अंगणातच होता, तिथे महायाजकाची एक दासी आली. 
तिने पेत्राला शेकोटीसमोर शेकताना पाहिले, तिने त्याच्याकडे निरखून पाहिले. “तू नासरेथकर येशूंबरोबर होतास.” 
पण पेत्र नकार देत म्हणाला, “तू कशासंबंधी बोलतेस हे मला समजत नाही.” मग तो द्वाराकडे गेला. 
त्याला तिथे उभे असलेल्या दासीने पाहिले आणि ती पुन्हा म्हणाली, “हा मनुष्य त्यांच्यापैकी एक आहे!” 
पेत्राने ते पुन्हा नाकारले. थोड्या वेळाने जी माणसे तिथे उभी होती. त्यातील काहीजण पेत्राला म्हणाले, “तू खरोखर त्यांच्यापैकीच आहेस, कारण तू गालील प्रांताचा आहेस!” 
हे ऐकून पेत्र शाप देऊ लागला व शपथ घेऊन त्यांना म्हणू लागला, “ज्या माणसाविषयी तुम्ही बोलत आहात, त्या मनुष्याला मी ओळखत सुद्धा नाही.” 
तेवढ्यात कोंबडा दुसर्‍या वेळेला आरवला. त्याबरोबर पेत्राला येशूंचे शब्द आठवले, “कोंबडा दोन वेळा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील.” तेव्हा पेत्र दूर निघून गेला आणि अतिशय दुःखाने रडला. 
