﻿गीतरत्न.
5.
माझ्या भगिनी, माझ्या वधू, मी माझ्या बागेत आलो आहे; सुगंधी द्रव्यांबरोबर मी माझा गंधरसही गोळा केला आहे. मी मधाबरोबर आणि माझ्या मधाचे पोळे खात आहे. मी माझे द्राक्षारस आणि दूध प्यालो आहे. मित्र माझ्या मित्रांनो, खा आणि प्या; प्रीतीच्या आनंदाने भरून जा. 
मी झोपले होते परंतु माझे हृदय जागेच होते. ऐका! माझा प्रियकर दरवाजा ठोकीत आहे: “माझ्यासाठी उघड, माझ्या भगिनी, माझ्या प्रिये, माझी कबुतरी, माझ्या सर्वांग सुंदरी. माझे डोके दवबिंदूने चिंब भिजले आहे, माझे केस रात्रीमुळे ओलसर झाले आहे.” 
माझा पोशाख मी काढून ठेवला आहे— तो मी पुन्हा घालू काय? मी माझे पाय धुतले आहेत, ते मी पुन्हा मळवू काय? 
माझ्या प्रियसख्याने बाहेरून हात घालून कडी उघडण्याचा प्रयत्न केला; तेव्हा माझे हृदय त्याच्यासाठी धडधडू लागले. 
माझ्या प्रियकरासाठी दार उघडण्यास मी उठले, आणि दाराच्या कडीवर आणि माझ्या हातांतून गंधरसाचे अत्तर पाझरले, माझ्या बोटांतून गंधरस स्त्रवला. 
माझ्या प्रियसख्यासाठी मी दार उघडले, पण तो तिथून निघून गेला होता; तेव्हा माझे हृदय गळून गेले. मी त्याला चोहीकडे शोधले, पण तो कुठेच सापडला नाही. मी त्याला हाक मारली, पण त्याने उत्तर दिले नाही. 
पहारेकरी नगरात गस्त घालत असता त्यांना मी सापडले. त्यांनी मला मारहाण केली; मला जखमी केले; तटावरील पहारेकर्‍यांनी तर माझी ओढणी काढून घेतली! 
यरुशलेमच्या कन्यांनो, मला हे वचन द्या, मी तुम्हावर एक कामगिरी सोपविते— जर तुम्हाला माझा प्रियकर सापडला, तर तुम्ही त्याला काय सांगाल? मी त्याच्या प्रेमासाठी झुरत आहे, असे सांगा. 
तुझ्या प्रियकरामध्ये इतरांहून अधिक असे काय आहे, हे परमसुंदरी? तुझ्या प्रियकरामध्ये इतरांहून अधिक असे काय आहे, की तू आम्हाला शपथ देऊन ही कामगिरी सोपवावीस? 
माझा प्रियकर तेजस्वी आणि लालबुंद, दहा हजारात श्रेष्ठ आहे. 
त्याचे मस्तक शुद्ध सोन्यासारखे आहे; त्याचे केस कुरळे असून डोमकावळ्यासारखे काळेभोर आहेत. 
ओढ्याच्या काठावर असलेल्या, कबुतरांप्रमाणे त्याचे डोळे आहेत, जसे ते दुधात धुतलेले, रत्नजडित केल्यासारखे आहेत. 
त्याचे गाल सुगंधी वनस्पतीच्या वाफ्यासारखे अत्तर दरवळणारे आहेत. त्याचे ओठ गंधरस गाळणार्‍या कमळपुष्पासारखे आहे. 
त्याचे बाहू पुष्कराजाने सुशोभित केलेल्या सुवर्णस्तंभासारखे आहेत. त्याचे शरीर नीलम रत्नांनी सुशोभित करून उजळ केलेल्या हस्तिदंतासारखे आहे. 
त्याचे पाय शुद्ध सोन्याच्या कोंदणात बसविलेले संगमरवरी स्तंभच आहेत. त्याचे रूप लबानोनासारखे आहे, उत्तम देवदारूसारखे आहे. 
त्याचे मुख परममधुर आहे; तो सर्वस्वी सुंदर आहे. यरुशलेमच्या कन्यांनो, हाच माझा प्रियकर, हाच माझा मित्र आहे. 
