﻿नीतिसूत्रे.
8.
सुज्ञान हाक मारीत नाही काय? समंजसपणा तिचा आवाज उंचावत नाही का? 
रस्त्याच्या कडाला असलेल्या सर्वात उंच जागेवर, जिथे रस्ते जोडले जातात, तिथे ती उभी राहते; 
शहरात जाणार्‍या वेशीच्या बाजूला, प्रवेशद्वाराजवळ ती ओरडून सांगते: 
“अहो लोकांनो, मी तुम्हाला बोलाविते; सर्व मानवजातीला उद्देशून मी माझा आवाज उंचाविते. 
तुम्ही जे साधे भोळे आहात, समंजसपणा मिळवा; तुम्ही जे मूर्ख आहात, तुमचे लक्ष तिच्याकडे लावा. 
ऐका! कारण मला काही विश्वसनीय गोष्टी सांगावयाच्या आहेत; योग्य ते सांगण्यासाठीच मी माझे मुख उघडते. 
माझे मुख सत्य बोलते, कारण माझे ओठ वाईटाचा तिरस्कार करतात. 
माझ्या मुखातील सर्व शब्द नीतियुक्त आहेत; त्यातील कोणतेही कुटिल किंवा विकृत नाहीत. 
जे समजूतदार आहेत त्यांच्यासाठी ते योग्य आहेत; ज्यांना ज्ञान प्राप्त झाले आहे त्यांना माझी वचने सुबोध आहेत. 
चांदीऐवजी माझ्या शिक्षणाची, आणि उत्कृष्ट सोन्यापेक्षा ज्ञानाची निवड कर.” 
कारण सुज्ञान माणकांपेक्षा उत्तम आहे; तुला आवडणाऱ्या इतर कशाशीही तिची तुलना करता येणार नाही. 
मी, सुज्ञान, सुज्ञतेबरोबर सहवास करते; ज्ञान आणि विवेक माझ्याकडे आहेत. 
याहवेहचे भय धरणे म्हणजे वाईटाचा द्वेष करणे होय. गर्विष्ठपणा आणि उद्धटपणा, वाईट आचरण आणि विकृत भाषण यांचा मी तिरस्कार करते. 
सल्ला आणि अचूक न्याय माझे आहेत; माझ्याकडे अंतर्ज्ञान आणि शक्ती आहे. 
माझ्याद्वारे राजे राज्य करतात, आणि शासन करणारे योग्य तो हुकूमनामा देतात; 
माझ्याच साहाय्याने अधिपती, आणि थोर—पृथ्वीवरील सर्व नीतिमान शासक अधिकार चालवितात. 
जे माझ्यावर प्रीती करतात त्यांच्यावर मी प्रीती करते, आणि जे माझा शोध घेतात त्यांना मी सापडते. 
माझ्याजवळ समृद्धी आणि सन्मान, कायम टिकणारी संपत्ती आणि वैभव आहे. 
माझे फळ शुद्ध सोन्यापेक्षा चांगले आहे; आणि माझ्याद्वारे उत्पन्न झालेले उत्कृष्ट चांदीपेक्षा उत्तम आहे. 
मी नीतिमत्वाच्या मार्गाने चालते, आणि न्याय्यमार्गाला धरून राहते, 
माझ्यावर प्रीती करणाऱ्यांना मी समृद्ध वारसा देते. आणि त्यांची भांडारे मी भरून टाकते. 
याहवेहनी त्यांच्या सृष्टी निर्मितीमध्ये, त्यांच्या पुरातन कार्यापूर्वी सर्वप्रथम माझी रचना केली; 
अनादिकालापासून माझी रचना केलेली होती. जेव्हा जग अस्तित्वात आले तेव्हाच. 
जेव्हा महासागर नव्हते, माझा जन्म झाला होता, तेव्हा ओसांडून वाहणारे झर्‍यांचे पाणीही नव्हते; 
पर्वत त्यांच्या जागेवर स्थिर झाले नव्हते, डोंगर निर्माण होण्यापूर्वी माझा जन्म झाला होता, 
त्यांनी पृथ्वी किंवा तिच्यावरील शेती किंवा पृथ्वीवरील धूळ निर्माण करण्यापूर्वी, 
त्यांनी जेव्हा आकाशास त्याच्या ठिकाणी स्थापित केले, जेव्हा त्यांनी महासागरावर क्षितिजाची सीमा निश्चित केली तेव्हा मी तिथे होते, 
जेव्हा त्यांनी वर अंतराळात ढगांची प्रस्थापना केली आणि पृथ्वीगर्भातील झर्‍यांना घट्ट बसविले, 
जेव्हा त्यांनी सागरांना त्यांच्या मर्यादा घालून दिल्या, जेणेकरून पाणी त्यांच्या आदेशाचे उल्लंघन करणार नाही. जेव्हा त्यांनी पृथ्वीचा पाया घातला, 
तेव्हा मी सतत त्यांच्याभोवती होते; दिवसेंदिवस मी आनंदाने भरून गेले होते. नेहमी त्यांच्या उपस्थितीचा आनंद मी घेत होते, 
त्यांच्या संपूर्ण जगामध्ये मी आनंदात आहे आणि मानवजातीमध्ये आनंद करीत आहे. 
“आणि म्हणून मुलांनो, माझे ऐका, कारण जे माझी शिकवण आचरतात, ते खूप आशीर्वादित होतात. 
माझे शिक्षण कान देऊन ऐका आणि शहाणे व्हा; त्याचा अव्हेर करू नका. 
जे व्यक्ती माझे ऐकतात ते धन्य आहेत, ते रोज माझ्या दारांवर लक्ष ठेऊन, माझ्या दारावर प्रतीक्षा करतात. 
कारण ज्याला मी सापडते, त्याला जीवन सापडते, आणि त्याला याहवेहकडून कृपादृष्टी मिळते. 
परंतु जे माझा शोध घेण्यास चुकतात, ते स्वतःचे नुकसान करून घेतात; जे सर्व माझा तिरस्कार करतात, ते मृत्यूची आवड धरतात.” 
