﻿स्तोत्रसंहिता.
140.
संगीत दिग्दर्शकाकरिता दावीदाची रचना. एक स्तोत्र. याहवेह, मला दुष्ट लोकांपासून सोडवा; हिंसक लोकांपासून मला सुरक्षित ठेवा. 
ते सतत मनात दुष्ट योजना करीत असतात व दररोज युद्ध भडकावित असतात. 
त्यांनी त्यांच्या जिभा सर्पाच्या जिभेप्रमाणे तीक्ष्ण केली आहे; नागाचे विष त्यांच्या ओठांवर असते. सेला 
दुष्टांपासून माझे रक्षण करा, याहवेह; त्या हिंसक लोकांपासून मला सुरक्षित ठेवा, कारण मला पाडण्याचा ते कट करीत आहेत. 
या गर्विष्ठ लोकांनी मला पकडण्यासाठी पाश लपविले आहेत; त्यांनी रस्त्याच्या बाजूस दोरांचे जाळे पसरले आहे, आणि माझ्या मार्गावर सापळे रचले आहेत. सेला 
याहवेहला मी म्हणतो, “तुम्हीच माझे परमेश्वर आहात.” याहवेह, माझ्या विनवणीकडे कान द्या. 
सार्वभौम याहवेह, माझ्या सामर्थ्यवान तारणकर्त्या, युद्ध समयी तुम्हीच माझे शिरस्त्राण व्हा. 
या दुष्ट लोकांची अभिलाषा पूर्ण होऊ देऊ नका, याहवेह, त्यांच्या योजना यशस्वी होऊ देऊ नका. सेला 
ज्यांनी मला वेढा घातला आहे, त्यांचे मस्तक गर्वाने उंचावलेले आहे; त्यांच्या मुखातून निघालेले कपट त्यांच्यावरच उलटो. 
त्यांच्या मस्तकांवर निखारे पडोत; ते अग्नीत फेकले जावोत, जिथून सुटका होणार नाही, अशा खोल खाचात ते टाकले जावोत. 
या आमच्या भूमीवर निंदकांची वस्ती होऊ नये; संकटे त्यांना शोधून त्यांचा नाश करोत. 
मला माहीत आहे की याहवेह गरिबांना न्याय देतात, आणि गरजवंतांना खात्रीने साहाय्य करतात. 
निश्चितच नीतिमान लोक तुमची उपकारस्तुती करतील; आणि नीतिमान तुमच्या समक्षतेत राहतील. 
