﻿स्तोत्रसंहिता.
129.
प्रवाशांचे आराधना गीत. “माझ्या किशोरावस्थेपासून त्यांनी माझ्यावर घोर अत्याचार केला आहे,” इस्राएल म्हणो; 
“माझ्या किशोरावस्थेपासून माझ्यावर घोर अत्याचार करण्यात आला आहे, तरीही त्यांना माझ्यावर विजय मिळविता आला नाही. 
शेतकर्‍याने नांगरल्याप्रमाणे त्यांनी माझ्या पाठीवर लांब लांब तासे काढली. 
परंतु याहवेह न्यायी आहेत; त्यांनी मला त्या दुष्टांच्या बंधनातून मुक्त केले.” 
सीयोनाचा द्वेष करणारे सर्व लाजिरवाणा पराजय होऊन परत जावोत. 
घरांच्या छपरावर उगविलेल्या गवतासारखे ते होवोत, जे अर्धवट वाढल्याबरोबर सुकून पिवळे पडते; 
कापणार्‍यांच्या हातात काहीही पडत नाही, की बांधणार्‍यांनाही पेंढ्या मिळत नाहीत. 
येणारे जाणारे लोक त्यांना असे न म्हणोत, “याहवेहचे आशीर्वाद तुम्हावर येवोत; आम्ही तुम्हाला याहवेहच्या नावाने आशीर्वाद देतो.” 
