﻿स्तोत्रसंहिता.
114.
जेव्हा इस्राएल इजिप्तमधून, परकीय भाषेच्या लोकातून याकोब बाहेर पडला, 
यहूदाह परमेश्वराचे पवित्रस्थान, आणि इस्राएल त्यांचे सार्वभौमत्व झाले. 
तांबड्या समुद्राने हे पाहून पळ काढला, आणि यार्देन नदी माघारी गेली; 
पर्वतांनी मेंढ्यांप्रमाणे आणि टेकड्यांनी कोकरांसारख्या उड्या मारल्या. 
हे समुद्रा, तू पलायन का केले? अगे यार्देने, तू मागे का फिरलीस? 
पर्वतांनो, तुम्ही मेंढ्यांप्रमाणे, टेकड्यांनो, तुम्ही कोकरांसारखे का बागडलात? 
अगे पृथ्वी, तू परमेश्वराच्या समक्षतेत, याकोबाच्या देवासमोर, थरथर काप. 
कारण त्यांनीच खडकाचे झर्‍यात रूपांतर केले, अत्यंत कणखर खडकास जलाचे स्त्रोत बनविले. 
