﻿स्तोत्रसंहिता.
91.
जो परमोच्चाच्या आश्रयाखाली राहतो, तो सर्वसमर्थाच्या सावलीत राहील. 
मी याहवेहला म्हणेन, “तेच माझा आश्रय व माझा दुर्ग आहेत, माझे परमेश्वर, ज्यांच्यावर मी भरवसा ठेवला आहे.” 
कारण ते पारध्याच्या पाशापासून आणि प्राणघातक मरीपासून तुझे रक्षण करतील. 
ते आपल्या परांनी तुझ्यावर पाखर घालतील, त्यांच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल; त्यांचे सत्य तुझी ढाल व गड होईल. 
तुला अंधकाराच्या आतंकाचे भय वाटणार नाही, किंवा दिवसा सुटणार्‍या बाणांचेही नाही. 
अंधारात दबा धरून राहणार्‍या मरीचे, किंवा भर दुपारी येणार्‍या आपत्तीचेही भय वाटणार नाही. 
हजार लोक तुझ्याजवळ पडले, आणि दहा हजार तुझ्या उजव्या बाजूला पडले, तरी ती संकटे तुझ्या जवळदेखील येणार नाहीत. 
तू केवळ आपल्या दृष्टीने निरीक्षण करशील, आणि दुष्टांना केलेली शिक्षा बघशील. 
जर तू म्हणाला, “याहवेह माझे आश्रयस्थान आहेत,” आणि तू परमोच्चास आपले निवासस्थान केलेस, 
तर तुला कोणतीही इजा होणार नाही, किंवा कोणतेही अरिष्ट तुझ्या तंबूजवळ येणार नाही. 
कारण ते आपल्या स्वर्गदूतांना तुझ्यासंबंधाने आज्ञा देतील, म्हणजे तू जाशील तिथे तुझे रक्षण व्हावे. 
ते तुला त्यांच्या हातांवर उचलून धरतील, म्हणजे तुझ्या पायाला दगडाची ठेच लागू नये. 
तू सिंह आणि नागाला चिरडशील; भयंकर सिंहाला व सर्पाला तू आपल्या पायाखाली तुडवशील. 
याहवेह म्हणतात, “तो मजवर प्रीती करतो, म्हणून मी त्याला सोडवेन, त्याचे रक्षण करेन, कारण त्याने माझा नामाधिकार मान्य केला आहे. 
तो माझा धावा करेल, तेव्हा मी त्याला उत्तर देईन; त्याच्या संकटकाळी मी त्याच्याबरोबर असेन; मी त्याला सोडवेन आणि त्याचा सन्मान करेन. 
दीर्घायुष्य देऊन मी त्याला तृप्त करेन, आणि त्याला माझ्या तारणाचा अनुभव घडवेन.” 
