﻿स्तोत्रसंहिता.
19.
संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाचे स्तोत्र. आकाश परमेश्वराची महिमा वर्णिते; अंतराळ त्यांच्या अद्भुत हस्तकृतीची घोषणा करते. 
दिवसेंदिवस ते वार्तालाप करतात; प्रत्येक रात्री ते ज्ञान प्रगट करते. 
या प्रकियेत बोलणे नाही, शब्दही नाही, त्यात आवाजही नाही; 
तरीही पृथ्वीच्या दिगंतापर्यंत त्यांची वाणी जाते, कारण जगाच्या शेवटपर्यंत त्यांचा शब्द गेला आहे. परमेश्वराने सूर्यासाठी स्वर्गात मंडप तयार केला आहे. 
आपल्या मंडपातून निघालेल्या तेजस्वी वराप्रमाणे, जसा एखादा विजेता आपली धाव पूर्ण करण्यास उल्लासतो. 
तो आकाशाच्या एका टोकास उगवतो दुसर्‍या टोकापर्यंत परिक्रमा पूर्ण करतो; त्याच्या उष्णतेपासून काहीही लपून राहू शकत नाही. 
याहवेहचे नियम उत्कृष्ट आहेत; ते आत्म्याला ताजेतवाने करतात. याहवेहचे नियम विश्वसनीय आहेत, ते भोळ्यांना सुज्ञ करतात. 
याहवेहचे नियम योग्य आहेत, ते हृदयास आनंद देतात, याहवेहच्या आज्ञा तेजस्वी आहेत, त्या नेत्रांना प्रकाश देतात. 
याहवेहचे भय निर्मळ आहे, ते सर्वकाळ टिकणारे आहेत. याहवेहचे निर्णय स्थिर आहेत, आणि ते सर्व पूर्णतः नीतिमान आहेत. 
सोन्यापेक्षा ते अधिक मौल्यवान आहेत, अतिशुद्ध सोन्यापेक्षाही; ते मधापेक्षा मधुर आहेत, पोळ्यातील मधाहूनही ते अधिक गोड आहेत. 
कारण ते तुमच्या सेवकांस सावध करतात; त्याचे पालन करणार्‍यास मोठे प्रतिफळ मिळते. 
स्वतःच्या चुका कोणाला समजणार? माझ्या गुप्त दोषांबद्धल मला क्षमा करून निर्दोष ठरवा. 
तसेच जाणूनबुजून पाप करण्यापासून आपल्या सेवकास थांबवा; ते मला त्याच्या अधीन करू नये. तेव्हाच मी दोषमुक्त होईन, एखाद्या मोठ्या गुन्ह्याबाबत निर्दोष ठरेन. 
याहवेह, माझे खडक आणि माझे तारणहार, माझ्या मुखातून निघालेले शब्द आणि माझ्या अंतःकरणातील मनन तुमच्या नजरेत संतोष देणारे होवोत. 
