﻿स्तोत्र.
141.
दाविदाचे स्तोत्र हे परमेश्वरा, मी तुला मोठ्याने ओरडून हाक मारतो; माझ्याकडे त्वरेने ये. जेव्हा मी तुला हाक मारतो तेव्हा माझे ऐक. 
माझी प्रार्थना तुझ्यासमोर धुपाप्रमाणे, ती माझे हात उभारणे संध्याकाळच्या अर्पणाप्रमाणे सादर होवो. 
हे परमेश्वरा, माझ्या मुखावर पहारा ठेव; माझ्या ओठांचे द्वार सांभाळ. 
अन्याय करणाऱ्या मनुष्यांबरोबर मी त्याच्या पापमय कार्यात सहभागी होऊ देऊ नकोस, जे दुष्कर्मे करतात त्यांची मिष्टान्ने मला खाऊ देऊ नकोस. 
नितीमान मनुष्य मला तडाखा मारो; ती मला दयाच होईल. तो मला दुरुस्त करो. ते माझ्या डोक्यावर तेलासारखे होईल. माझे डोके ते स्वीकारण्यास नकार देणार नाही. परंतु माझ्या प्रार्थना नेहमी दुष्ट लोकांच्या कृत्याविरूद्ध आहेत. 
त्यांच्या अधिपतींना कड्यावरून खाली लोटून दिले आहे; ते माझी वचने ऐकतील कारण ती गोड आहेत. 
जमीन नांगरताना आणि ढेकळे फोडताना जशी माती विखरली जाते, तशीच आमची हाडे अधोलोकांच्या तोंडाशी विखरली गेली आहेत. 
तरी हे प्रभू परमेश्वरा, खचित माझे डोळे तुझ्याकडे लागले आहेत; मी तुझ्यात आश्रय घेतला आहे; माझा जीव निराधार सोडू नकोस. 
त्यांनी माझ्यासाठी जो पाश रचला आहे त्यातून व दुष्कर्म करणाऱ्यांच्या सापळ्यातून माझे संरक्षण कर. 
दुष्ट आपल्या स्वतःच्या जाळ्यात पडोत, मी त्यातून निसटून जाईन. 
