﻿स्तोत्र.
112.
परमेश्वराची स्तुती करा. जो मनुष्य परमेश्वराच्या आज्ञा पाळतो, जो त्याच्या आज्ञेत मोठा आनंद करतो, तो आशीर्वादित आहे. 
त्याचे वंशज पृथ्वीवर शक्तीमान होतील; धार्मिक आशीर्वादित होतील. 
धन व श्रीमंती त्यांच्या घरात आहेत; त्यांचे नितीमत्व सर्वकाळ टिकते. 
धार्मिक मनुष्यांसाठी अंधकारात प्रकाश चमकवतो; तो दयाळू, कृपाळू आणि न्यायी आहे. 
जो मनुष्य दया करतो आणि उसने देतो, जो प्रामाणिकपणे वागून आपला व्यापार करतो त्याचे चांगले होते. 
कारण तो मनुष्य कधीही हलणार नाही; नितीमान मनुष्याची आठवण सर्वकाळ राहील. 
तो वाईट बातमीला भिणार नाही; त्याचा परमेश्वरावर भरवसा असून त्यास खात्री आहे. 
त्याचे हृदय निश्चल आहे, आपल्या शत्रूवर विजय मिळालेला पाहीपर्यंत तो भिणार नाही. 
तो गरीबांना उदारपणे देतो; त्याचे नितीमत्व सर्वकाळ राहील; तो सन्मानाने उंचविला जाईल. 
दुष्ट माणसे हे पाहतील आणि रागावतील; तो आपले दात खाईल आणि विरघळून जाईल; दुष्टाची इच्छा नाश होईल. 
