﻿स्तोत्र.
3.
दावीदाचे स्तोत्र; जेव्हा तो आपला मुलगा अबशालोम याच्यापुढून पळाला. परमेश्वरा, माझे शत्रू पुष्कळ आहेत! पुष्कळ वळले आणि माझ्यावर हल्ला केला आहे. 
“परमेश्वराकडून त्यास काहीएक मदत होणार नाही,” असे माझ्याविरूद्ध बोलणारे पुष्कळ आहेत. सेला 
परंतु हे परमेश्वरा, तू माझ्या सभोवती ढाल असा आहेस, तू माझे वैभव, आणि माझे डोके वर करणारा आहे. 
मी माझा आवाज परमेश्वराकडे उंच करीन, आणि तो मला त्याच्या पवित्र डोंगरावरून उत्तर देईल. सेला 
मी अंग टाकून झोपी गेलो; मी जागा झालो, कारण परमेश्वर माझे रक्षण करतो. 
जे सर्वबाजूंनी माझ्यासाठी टपून बसले आहेत, त्या लोकसमुदायला मी घाबरणार नाही. 
हे परमेश्वरा उठ, माझ्या देवा, मला तार! कारण तू माझ्या सर्व शत्रूंच्या थोबाडीत मारली आहेस, तू दुष्टांचे दात पाडले आहेत. 
तारण परमेश्वरापासूनच आहे, तुझ्या लोकांवर तुझा आशीर्वाद असो. सेला. 
